सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – कवी आणि कविता – माया धुप्पड

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 1:08 am
in इतर
0
IMG 20201118 WA0015

मानवी वर्तनाची आणि निसर्गाच्या भाववृत्तीची

हळुवार कविता लिहिणारी कवयित्री : माया धुप्पड

कथाकथन, कवितावाचन , गीतलेखन, सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणा-या अष्टपैलू कवयित्री माया धुप्पड यांची ही ओळख….

IMG 20200902 WA0034
प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)

मराठी साहित्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्री साहित्यिकांनीही मोठे योगदान दिले आहेत. शिक्षणाचा प्रसार जस जसा होत गेला, तसे स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे शहरी शिक्षित समाजातील स्त्रिया पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवत लेखनाकडे वळल्या. असे असले तरी ग्रामीण संस्कृतीत प्राचीन काळापासून स्त्रिया जात्यावरची गाणी गात होत्या. शेतात जातांना येतांना आणि काम करतांना गाणी गात होत्या. नागपंचमी, भुलाबाईची गाणी, गौरीची गाणी,लग्नातली गाणी गात होत्या. त्या गाण्यात त्यांच्या व्यथा आणि वेदनेचा,माहेरच्या स्वाभिमानाचा, वैभवाचा भाग प्रामुख्याने दिसत असे. खरं म्हणजे ती त्यांची अभिव्यक्ती होती.शिक्षणाच्या प्रसाराने अक्षरांचा परीस स्पर्श त्यांना झाला.त्यामुळे हळूहळू स्त्रिया आपले विचार शब्दांमधून व्यक्त होऊ लागल्या. महाराष्ट्रातील मराठी साहित्य परंपरेमध्ये फार प्राचीन महानुभाव संप्रदायापासून संतसाहित्यातून स्त्रियांचे लेखन वाचायला मिळते. आज किती तरी महिला साहित्य क्षेत्रात विशेषत: कवितेच्या क्षेत्रात आपल्या स्वतःच्या शैलीचा ठसा उमटवत आहे.

याच कवितेच्या परंपरेमध्ये खानदेशच्या मातीत बहिणाबाई चौधरींच्या कवितेचा समृध्द वारसा घेऊन आलेल्या, अहिराणी बोलीच्या संस्कारात संस्कारित झालेल्या,  कथाकथन, कवितावाचन , गीतलेखन, सूत्रसंचालन  अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणा-या, अष्टपैलू  व्यक्तिमत्व म्हणजे कवयित्री माया धुप्पड.  आज आपल्या कवी आणि कविता या सदरात जळगावमधून त्या सहभागी होत आहेत. त्यांच्या एकूण कवितांचा आस्वाद आपण घेणार आहोत.त्यांचे सोनचांदण, चांदणसाज, मनमोर, गीतनक्षत्र, भक्तिनिनाद, परिघाबाहेरील ती हे काव्यसंग्रह प्रकाशित आहे. तर वाऱ्याची खोडी, पावसाची राणी, गाऊ अक्षरांची गाणी, सावल्यांचं गाव, नाच रे बाळा, हत्तीचा व्यायाम, आभाळाची छत्री, गरगर घागर, चिमणी उडाली भुर्र…, सर्वांची बाग, नखरेल मोर, इत्यादी बालकाव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे पाऊस, चंद्र, आकाश स्फुटकाव्य आणि चिमणगीत हा हायकूसंग्रह प्रकाशित आहे. मनमोर, तू करूणेचा सिंधू, गरगर घागर, या ध्वनिफिती प्रकाशित झालेल्या आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा सन २००८ सालचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सावल्यांचे गाव या बाल कविता संग्रहासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा २०१६ चा बालकवी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणे, यांचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार, ग. ह. पाटील वाङ्मय पुरस्कार, कोल्हापूर बालसाहित्य संघाचा उत्कृष्ट बालकविता काव्यपुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे, यांचा बालसाहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अंकुर साहित्य संघाचा अक्षरवेल साहित्य पुरस्कार, स्वर निनाद खान्देश गौरव पुरस्कार, लोकमत खानदेश सन्मान पुरस्कार, शिवम बालकुमार आनंदी साहित्य पुरस्कार, अशा इतर अनेक पुरस्कारांनी कवयित्री माया धुप्पड यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. इयत्ता सातवीच्या सुगम भारती पाठ्यपुस्तकात व इयत्ता तिसरी आणि चौथीच्या मधुरवाणी पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच बालभारती संपादित किशोर मासिकाच्या संपादकीय सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून त्यांचे अनेक देशभक्तीपर गीते प्रसारित झालेले आहेत.

कवयित्री माया धुप्पड यांच्या कवितांमध्ये विविधता आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या लेखनावर परिणाम झालेला दिसतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या जाणिवांचा विचार त्या लेखनातून करताना दिसतात. निसर्ग, मानवी मन, मानवी जीवन, मानवी प्रवृत्ती अशा विविध अंगांनी त्यांच्या कविता येतांना दिसतात. एका विषयात त्यांनी स्वत:ला कधीच बंदिस्त करून घेतलेले दिसत नाही. म्हणून त्यांच्या कवितेत विविधता जाणवते. निसर्गप्रेम हा त्यांच्या कवितेचा खरं तर पाया आहे. निसर्गाच्या विविध घटकांचा त्यांच्या कवितांमध्ये समावेश होताना दिसतो. अवतीभवती वावरणारी माणसं, व्यवहारातील प्रतीकं आणि प्रतिमा यांचा सुंदर वापर त्यांनी आपल्या कवितांमध्ये करून घेतलेला दिसतो. त्यामुळे अनुभवाचा आंनद त्यांची कविता रसिकांना, वाचकांना देतांना दिसते.  माणसांची सुखदुःख त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतात. त्याचबरोबर स्वतःच्या मनातलं हितगूज त्या कवितांमधून व्यक्त करताना दिसतात. कविता त्यांना त्यांची सखी वाटते. मैत्रीण वाटते. त्यामुळे त्यांची कविता ही संवादी आणि प्रवाही होताना दिसते. निसर्गाच्या सानिध्यात त्या ज्यास्त काळ वावरतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या कवितेत निसर्गातील सगळेच विभ्रम शब्दबद्ध होताना दिसतात. विशेष म्हणजे स्वत:चा आत्मशोध त्या त्यांच्या कवितेतून घेताना दिसतात. त्यांच्या कवितांमध्ये मनातील अतिशय तरल भावना टिपण्याचा त्या कशोसीने प्रयत्न करतांना जाणवतात. तसेच त्यांच्या कवितेत विविध नाती डोकावताना दिसतात. विविध नात्यातील स्नेह, ओलावा, आत्मपरभाव, वृत्ती-प्रवृत्ती यांचा परामर्श कवितेमध्ये घेतांना जाणवते.

IMG 20201118 WA0014 e1605702646180

कवयित्री माया धुप्पड कुटुंबवत्सल असल्यामुळे कदाचित कळत नकळत हा सर्व परिणाम त्यांच्या लेखनातून जाणवत राहतो. त्यांची कविता वाचकांना फार जवळची वाटते. आपल्या अवतीभवतीच्या घटकांमुळे त्यांची कविता वाचकांना आपलीशी करते. त्यांच्या बालकविता या सर्वांच्याच मनाला मोहित करतात. संमोहित करतात. बालकांच्या मनावर तर गारुड करतात. लहान मुलांसाठी लहान होऊन लिहिणे अत्यंत कठीण काम असतं. हे सर्वांनाच जमेल असं नाही. परंतु कवयित्री माया धुप्पड आजही या वयात लहान मुलांसाठी अतिशय सुंदर आणि कसदार लेखन करत आहे. हे अतिशय कठीण काम त्या सहजपणे करतात. त्यांच्या बालकाव्यसंग्रहात लहान मुलांना आपलंसं करण्याची ताकद आहे. सामर्थ्य आहे. लयबद्धता आणि नादमाधुर्य हे त्यांच्या बालकाव्यसंग्रहाचे ठळक वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांची बालकविता ही बागेतल्या फुलासारखी दिवसेंदिवस उमलत आहे. प्रत्येक कवीची जडणघडण वेगवेगळ्या वातावरणात होत असते त्या वातावरणाची त्याच्यावर  संस्कार होतात. तिथल्या परंपरांचाही परिणाम कवीच्या मनावर होतो. प्रत्येक कवी स्वतःला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अभिव्यक्तीत सत्य, शिव आणि सुंदरतेचा  प्रत्यय घेण्याचा वाचकांनी प्रयत्न केला पाहिजे. कवयित्री माया धुप्पड यांची कविता अत्यंत रसाळ आणि प्रांजळ असून उत्कट भावनांचा आविष्कार शब्दाशब्दातून व्यक्त करणारी आहे. ती सहजपणे येतांना दिसते. या सहजतेमध्ये त्यांच्या कवितेचे खरे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. त्यांच्या कवितेत मनाची ओढ, अधीरता, ध्यास, सहवास, दुरावा, विरह,मिलन, एकरुपता यासारख्या प्रेमाच्या विविध छटा वाचकांना वाचायला मिळतात. कोमलता, हळुवारपणा, नाजूकता साधण्याचा प्रयत्न त्या करतांना दिसतात.  त्यांची एक कविता प्रेमभावनेचे अनेक रूपे मांडतांना दिसते. खरं म्हणजे कविता ही वाचायची गोष्ट नाही,तर ती  अनुभवायची गोष्ट असते. त्यामुळे कोणतीही चांगली कविता ही कधीच जुनी होत नसून ती रसिकांच्या मनात सदैव असते. अशी कविता सोबत करते. धीर देते. आधार बनते. प्रेरणा बनते. कवयित्री माया धुप्पड यांच्या कविता निसर्गाच्या अंगाने प्रवाहित होत जातात. निसर्गाच्या विविध प्रतिमा त्यांच्या कवितेमध्ये डोकावतात. त्यामुळे त्यांची प्रेम कविता ही निसर्गकविता होऊन जाते. त्यातून त्यांच्या कवितेला एक वेगळी उंची प्राप्त होते. तसं माणसाचं जीवन हे व्यथा आणि वेदनांचं माहेरघर आहे. सुख दुःखातून भविष्याची वाट चालता येते. असा दृढ विश्वास कवयित्री माया धुप्पड यांची कविता देते. कविता काय असते ? या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देतांना सहज सोप्या शब्दात त्या कवितेवर भाष्य करतात-

कविता म्हणजे काय असते ?

ऋतुऋतूतल्या झाडांचे हिरवे पिवळे पान असते

गायवासरांच्या गळ्यातील घुंगराची तान असते

कविता म्हणजे काय असते ?

डोलणाऱ्या वेलीवरचे फुलणारे फूल असते

आईच्या कडेवरचे गोजिरवाणे मूल असते.

कविता म्हणजे काय असते ?

कविता म्हणजे काय असते ?

स्वप्नांच्या किनाऱ्याने वाहणारी नाव असते

प्रत्येकाला हवे असे विसाव्याचे गाव असते.

इतक्या सोप्या शब्दात रसिक,वाचकाला कवितेची ओळख त्या करून देतात. खरं म्हणजे इतकी सोपी कवितेची व्याख्या करणं मोठं कठीण काम आहे. परंतु कवयित्री माया धुप्पड यांनी अगदी सर्वसामान्यांना समजावं इतक्या सोप्या शब्दात कवितेची व्याख्या मांडली आहे. जीवन हे सुख आणि दु:खाचं उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. जीवन हे ऊन सावलीचा खेळ आहे. तो प्रत्येकाला खेळता आला पाहिजे. त्यासाठी जीवन समजून घेता आलं पाहिजे.

सा-यांनाचजीवन जमजून घेता येतेच असे नाही. त्यामुळे कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. जीवनाचा मेळ घालता

आला पाहिजे . हे समजून सांगताना कवयित्री माया धुप्पड लिहितात-

भिजली माती, थांबून घे…  मातीत बी, रूजवून घे

शेत गाते, हिरवे गाणे…    तालावरती, डोलून घे.

वाहती नदी, पाहून घे….   इतरांसाठी, वाहून घे

दिसते जेव्हा, सृष्टी ओली…विसर दुःख, न्हाऊन घे.

पुढच्या वाटा, चालून घे….  उंच डोंगर, चढून घे

उंच उंच, चढताना …    जमीनफुले, माळून घे.

इतक्या सजगतेने जीवनातल्या सा-याच संदर्भांचा अर्थ उमजला पाहिजे. त्यासाठी जीवनातल्या सकारात्मक गोष्टींचा आस्वाद घेता आला पाहिजे. कधीतरी अंधार पडणार आहेच. हे निसर्गतत्व आहे. हे वास्तव सत्य आहे. ते जर समजून घेतले तर प्रकाशाचा आंनद घेण्याची उर्मी आपल्या वाढवता येणे शक्य असतं. तसेच जीवनातल्या दु:खाला सामोरे जाण्याची क्षमता आपल्या अंगी येते. हे कवयित्री माया धुप्पड यांनी निसर्गातील माती,बी,शेत,नदी,सृष्टी,वाटा, डोंगर, जमीन फुले या निसर्गातील प्रतिमांमधून किती सहजतेने आयुष्य जगण्याचं इंगित, अथवा सूत्र त्यांची कविता सांगून जाते.माणूस निसर्गाचं एक आपत्य आहे. निसर्गाकडून त्यांनं जाणीवपूर्वक शिकलं पाहिजे. त्यासाठी त्यानं पहिल्यांदा निसर्ग वाचायला शिकलं पाहिजे. हे सांगतांना कवयित्री माया धुप्पड लिहितात –

प्रत्येक झाड सांभाळून असते एक हिरवीगार सावली
ज्या जमिनीतून त्याची मुळे पाणी घेतात,

त्या जमिनीला सावली देण्यासाठी धडपडते

त्याच्याजवळ आशेने येणाऱ्या गुरावासरांना,

वाटसरूंना सावली देताना ते सुखावते

उन्हाचे चटके विसरून जाते

दिवसभरच्या उन्हात सावली देता यावी म्हणून

रात्री मात्र झाड आपली सावली आत ओढून घेते,

सांभाळून ठेवते

हे निसर्गाचं सूत्र माणसाने अवगत केलं पाहिजे. ही आग्रही भूमिका त्यांची कविता मांडतांना त्या दिसतात. निसर्गाकडून देण्याघेण्याचा वसा आणि वारसा आपण जर उचलला तर जीवन जगणं अधिकाधिक सोपे होते. त्याचबरोबर आपल्यातले दातृत्व सांभाळले पाहिजे. झाडं उन्हात उभे राहून इतरांना सावली देते. इतकेच नाही तर दिवसभर इतरांना सावली देण्यासाठी झाडं आपली सावली रात्रभर आपल्या आत ओढून ठेवतात. सांभाळून ठेवतात. हा त्याग आपल्या अंगी केव्हां येणार ? याची जाणीव तर त्यांची कविता देतेच. परंतु त्याचबरोबर स्वत:साठी जगताजगता इतरांसाठी जगण्याची, सहकार्य करण्याची मानसिकता विकसित करण्याची जाणीव धुप्पड यांची कविता देतांना दिसते. दु:खाला सामोरे जाण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी कवयित्री माया धुप्पड आपल्या कवितेतून मांडून जातात-

अंधारल्या रात्रीला मी भेट दिवसाची देते

माझे अंधाराचे गाणे उजेडाच्या हाती देते.

जीव जळू दे जळू दे राखखाक ती होऊ दे

तिच्यातून उगवते पुन्हा पुन्हा जन्म घेते.

नियतीने ठोकरता होई उलटे-पालटे

नियतीच्या हातामध्ये हात निश्चयाचा देते.

पानगळ पानगळ शिशिर हा अवखळ

ओंजळीत त्याच्या हिरव्या वसंताचे दान देते.

जीवनाच्या अंधा-या रात्रीतून प्रवास करतांना दिवसाचं महत्व समजून घ्या. दु:खाच्या काळात आंनदाचे क्षण आठवा. जळालेल्या राखेतून फिनिक्स बनण्याची जिद्द ठेवा.शिशिराच्या पानगळीतून हिरव्या वसंताचे दान मिळते हे विसरू नका. असा आत्मविश्वास त्यांची कविता वाचकांना नक्कीच देऊन जाते. त्याचबरोबर दु:खं बाजूला सारून सुखाची चर्चा नेहमी चारचौघात केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. हे सांगताना कवयित्री माया धुप्पड लिहितात –

सोसूनी दुःखे जगाची आम्ही सुखाशी भांडतो

झाकुनी भेगा स्वत:च्या आम्ही मनुष्ये सांधतो.

माणसांच्या या जथ्यातून वाट आम्ही शोधतो

शोधिता ठेवा सुखाचा वाटेस भलत्या लागतो.

अमावास्येच्या रात्री आम्ही चंद्रमाला शोधतो

पाहूनी तो कलंक त्याचा अश्रू आम्ही ढाळतो.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो जगू शकत नाही. त्यामुळे त्याने इतरांची दु:खे आपली समजून सहकार्य केले पाहिजे. दु:खं कुणाला नाही. ते तर प्रत्येकाच्या वाटेवर उभे आहे. त्याचाच विचार आपण करत बसलो, त्यालाच कुरवाळत बसलो तर दु:खं मोठं होतं आणि माणूस खुजा होतो. दु:खाला मोठं करू नका. दु:खाची बाजारपेठ कुणाच्याच पाहण्यात नाही. दु:खं वाटता येत नसले तरी ते हलके करता येते. त्यासाठी माणसं जोडण्याची भाषा माया धुप्पड यांची कविता करते.

नाकारला नाही रात्रीचा अंधार तरी उजेडाचे गाणे गाणार आहे

झुगारली नाही युगाची बंधने छोट्याशा पंखांनी उडणारच आहे.

संपूर्ण आकाश नाही माझी ठेव चंद्राशी जवळीक ठेवणार आहे

नाकारले नाही काट्यांचे हे जग वेचून फुलांना माळणार आहे.

वाइटाची नाही जगात या वाण चांगल्याची जाण ठेवणार आहे

नको कसा म्हणू मरणाचा क्षण तोवर जीवन जगणार आहे.

माणसाने जीवनातलं दु:खं नाकारून चालणार नाही. त्यांना सोबत घेऊन, त्यांच्याशी मैत्री करून वाटचाल करण्याची गरज आहे. त्यामुळे अंधाराला नाकारून चालणार नाही. काट्यांना नाकारून चालणार नाही. अंधाराशिवाय दिवस नाही. कट्यांशिवाय रस्ता नाही. वाईटांची नाही ठेवली तरी चांगल्यांची जाण तर ठेवावी लागेल. कारण तीही जाण आपण ठेवू शकलो नाही तर आपल्या इतके कृतघ्न आपणच ठरू. हे सांगायला कवयित्री माया धुप्पड यांची कविता विसरत नाही.

आकांक्षाचा किल्ला चढायचाय मला

अडथळ्यांचा तट ओलांडू कशी ?

नक्षत्रांच्या गावात राहयचंय मला

पायांना रस्ता दाखवू कशी ?

 

उजेडाच्या प्रदेशात गायचंय मला

काळोखाला दूर सारू कशी ?

दूरचा किनारा गाठायचाय मला

तुफानी वादळांना परतवू कशी ?

एकूणच धुप्पड यांची कविता धोपट मार्गावरची अभिव्यक्ती आहे. मनातल्या सा-या आकांक्षा पूर्ण होण्यासाठी वाटेतले आडथळे दूर सारले पाहिजे. काळोख दूर केल्याशिवाय उजेड दिसणार नाही. आणि उजेडाशिवाय धोपट मार्ग मिळणार नाही. असा मार्ग सापडल्याशिवाय जीवनातील ध्येय गाठता येणार नाही. असा साधा सरळ सल्लाच कविता देतांना दिसते. निसर्गातील विविध विभ्रम माणसाच्या मनाला आकर्षित करतात. त्या विभ्रमांचं वास्तवरूप समजून घेण्याचा प्रयत्न त्यांची कविता करतांना दिसते. वेड्या पावसासाठी मन भरून गाण्याची भाषा त्यांची कविता करतांना दिसते. रान हिरवं होण्यासाठी पाऊस होण्याची भाषा त्यांची कविता करतांना दिसते. त्यासंदर्भात कवयित्री माय्या धुप्पड लिहितात-

गाणं वेड्या पावसाचं, मनभरून गाऊ दे

रान हिरवं होऊ दे, मला पाऊस पाहू दे ।।

 

निळे, जांभळे नि काळे, मेघ नाचत निघाले

रुणझुणत्या थेंबांचे, पायी पैंजण वाजले

नाद पैंजणाचा बाई, माझ्या मनात राहू दे ।।

 

धारा रिमझिम आल्या, संगे ऊन उतरले

पावसाळी पंखावर, इंद्रधनुष्य झेलले

रानपक्ष्यांची भरारी, माझ्या मनात राहू दे ।।

वेडा पाऊस, भरलं मन, हिरवं रान, निळे जांभळे मेघ,रुणझुणते थेंब,पैंजणाचा नाद, रिमझिम धारा,पावसाळी पंख,पक्ष्यांची भरारी या आशयगर्भ प्रतिमांनी कवितेला एक आल्हादायक नाद आणि लय बहाल केली आहे. इतका लाघवी निसर्ग माया धुप्पड यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेला पहावयास मिळतो. त्यामुळे त्यांची

कविता वाचकांना आपली वाटते. कोणत्याही स्वरूपाच्या मर्यादा हे बंधनेच ठरतात. त्या बंधनापलीकडे जाण्याची भाषा त्यांची कविता करतांना दिसते. ते सांगतांना कवयित्री माया धुप्पड लिहितात-
मजला नको किनारा, पुढे पुढेच जाऊ दे

डौलदार लाटांचे, गीत नवे गाऊ दे ।॥।

 

गगनीचा चंद्र आज पाण्यातून वाहतो

चांदण हातात पुन्हा स्वप्नहार गुंफतो

श्वास असे चांदण्यात एकरुप होऊ दे ।।

 

निघाली ही एक नाव गाव सोडुनिया चालली

पुढेच सर्व बंध तोडुनिया हृदयाचे भाव

सर्व, मौनातच सहू दे।।

मर्यादांच्या बंधनापेक्षा गतिमान लाटांना सामोरे जाण्यात मजा असते.त्यांच्यासोबत आपल्या जीवनाचे गीत गाणे हा सर्वात मोठा आत्मविश्वास त्यांची कविता देतांना दिसते.संघर्ष हाच जीवनाचा स्थायीभाव असावा.त्या शिवाय जीवनाला खरी झळाळी येत नसते. जीवन आळणी आणि बेचव करून जगण्यात काहीच अर्थ नसतो. हे त्यांची कविता स्पष्ट शब्दात सांगून जाते. स्त्रीमनाचा खरा प्रेरणाश्रोत कोण असेल तर ती म्हणजे …. आई. आई हेच संसारातील फुलणारं, फळणारं झाडं असतं. संसाराच्या सागरात नाव वल्हवणारी कुशल नावाडी असते. कोणत्याही वादळ वा-यात संसाराची नौका ती सुरक्षित पणे ती किना-याला लावते. हे सांगतांना कवयित्री माया धुप्पड आईची थोरवी गातात-

उभे संसाराचे झाड । कसे फळते फुलते

मुळे झाडाची बनून । आई ओलावा शोधते

भर उन्हाळ्यात हाक । देते ओल्या पावसाला

भरली ही चंद्रभागा । आई नेमाने वाहते.

 

जीवनात तोलातोल । सले अंतरात बोल

आई तुळशीचे पान । सुखदुःखांशी ठेवते

तुझे-माझेच गा-हाणे । नात्यानात्यातली दरी

उभ्या भिंतीचे ते तडे । आई बळेच सांधते

भरदिवसा ही जेव्हा । रात उभी काळोखाची

तेव्हा बनून चांदणे । आई उजेड सांडते.

आईचे मोठेपण, आईची थोरवी एकूणच आईचे महात्म्य त्यांची कविता अधोरेखित करते. संसारातील बारीकसारीख गोष्टीकडे आई किती लक्ष देते. नात्यानात्यातील पडलेल्या द-यांना आई ख-या अर्थाने सांधण्याचे काम करते. अडीअडचणींवर मात करते. अंधा-या रातीला स्वत: उजेड बनते. आणि काळोखातून आयुष्याची वाट शोधते. अशा आईच्या जीवनात जेव्हा वैधव्य येतं तेव्हा तिचं घरटं विस्कटून जातं. अशा घरटं विसकटलेल्या आईच्या आयुष्याची कैफियत मांडताना कवयित्री माया धुप्पड अत्यंत तरल शब्दात आईच्या मनाचा ईसीजी शब्दातून रेखाटताना लिहितात –

मला कुंकवाचा अर्थ कळायच्या आतच आई,

तुझ्या कपाळीचं कुंकू पुसलं गेलं

तेव्हा मला माहित होतं फक्त…

तुझा पदर धरणं आणि

तुझ्याभोवती बागडणं

तुझ्या कपाळाकडे नाही,

 

मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहायचे  

पण माझ्यासाठी तू कपाळावरचं कुंकू

जीवनाच्या पाऽऽर ठेवलंस मला सांभाळलंस

मेणासारखं मऊ ठेवलंस

माझ्यासाठी तू स्वत: कुंकू बनलीसं,

मेण आणि कुंकू यांच एक आगळवेगळं नातं.

माय आणि लेकीचं एकमेकींना असं समजून घेणं आणि देणं यासाठी आईचंच संवेदनशील मन असायला हवं. ते मन असल्याशिवाय शक्य होईल असं वाटत नाही. लेक आणि माय या दुहेरी भूमिकेमुळे कवयित्री माया धुप्पड यांना हे सहज शक्य झाले आहे. आयुष्याच्या तिस-या पर्वात वावरताना आलेलं विचारांचं व्यापकपण, प्रगल्भता त्यांच्या कवितेची व्यापकता वाढवणारे आहे. त्यांची व्यक्तिगत पातळीवरची कविता विश्वात्मक विचार करू लागते. ज्ञानदेवासारखे पसायदान मागू लागते. ते पसायदान मागतांना कवयित्री माया धुप्पड आपल्या कवितेत लिहितात-

सत्य-शिव-मंगलाचा जीवनाला ध्यास दे

आस माझी पूर्ण होवो, दे प्रभू विश्वास दे .

 

आई ज्यांची जमीन काळी, अन् पिता आकाश रे

या जगाचे पोट भरण्या, राबती जे हात रे

त्या बळीराजास देवा, दे सुखाचा घास दे .

 

देशरक्षण ध्यास घेऊन, जे सीमेवर नांदती

औक्षणासाठी सख्या या, प्राणज्योती लावती

कुंकवाला त्या सख्यांच्या, दे प्रभू तू औक्ष दे.

 

घे कसोटी आमुची तू, वेदना दे दुःख दे

पार यातून जावयाला, धीर दे तू धैर्य दे

यावयाला तुजकडे रे, एक रस्ता खास दे.

भूमीवर काबाड कष्ट करण्यात ज्याची उभी हायात जाते. त्या कष्टाच्या घामातून तो मातीतून मोती

पिकवितो. सा-या जगाची भूक भागवितो त्या कास्तकराच्या, कुणब्याच्या पोटात सुखाचा घास मिळण्याची प्रार्थना त्यांची कविता करते. सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे शत्रूंपासून रक्षण करतो. त्या सैनिकांच्या पत्नीच्या कुंकवाला बळ देण्याची, त्यांचं कुंकू आबादित ठेवण्याची प्रार्थना करते. परमेश्वरा कसोटी घे. वेदना दे. दु:खं दे. पण त्यांच्या सोबतीला धीर आणि धैर्य दे. आयुष्याच्या अखेरीस तुझ्याजवळ येण्यासाठी एक खास रस्ता दे. अशी इतरांसाठी मागणी त्यांची कविता करते. मला वाटतं हे विश्वात्मक व्यापकत्व कवितेत तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही तुमच्या पलीकडे पाहू लागतात. दुस-यांच्या वेदनांच्या संवेदना तुम्हाला त्रस्त करतात. तेव्हाच हे असं येऊ लागतं.

थोडक्यात कवयित्री माया धुप्पड यांच्या प्रत्येक कवितेत मनातल्या संवेदना आणि नाद माधुर्याचा अविष्कार जाणवतो. यांच्या निसर्ग कवितेत  विषयांची विविधता जाणवते. निसर्गाकडे बघण्याची त्यांची दृष्टी ही सतत बदलताना दिसते. वेगवेगळ्या रुपात त्या निसर्गाचा अनुभव घेतात आणि कवितेतून व्यक्त होतात. मनाच्या दुःखाचा कढ वाढत जातो तेव्हा निसर्ग हाच त्यांना जवळचा वाटतो. निसर्गातूनच त्यांची इच्छाशक्ती ही प्रवाहित होतांना दिसते. त्या कवितांमध्ये स्त्रीमुक्तीचा विचार प्रकट करताना दिसतात. अशा कवितांमध्ये सौम्य पण भेदक शब्दात त्यांच्या अंत:करणातली वेदना व्यक्त होताना दिसते. त्यामुळे त्यांची कविता वाचकाच्या मनाला भिडते. त्यांच्या कवितेत स्त्रियांच्या जगण्याचा पाढा मांडतांना दिसतात. आयुष्याचा उखाणा घेताना दिसतात. निसर्गाच्या शृंगारात डूबतांना दिसतात. तर कधीकधी सामाजिक संवेदनेने जाग्या होताना दिसतात. स्त्रीयांचे दुःख त्यांच्या आयुष्याला एक वेगळी बळकटी आणून देते. त्यांच्या कवितेत ईश्वराबद्दलचा भक्तिभाव डोकावतो. त्या त्या संकटकाळात तो मनाला  समाधान देतो. त्यांच्या कवितेतल्या प्रतिमा अत्यंत साध्या आणि सरळ स्वरूपात येतात. त्यांच्या कवितेत कुठेही ओढूनताढून आधुनिकता आणण्याचा अट्टाहास दिसत नाही. परंतु अनुकरणाचा प्रभाव त्यांच्या कवितेवर पडलेला जाणवतो. तो भविष्यात प्रयत्नपूर्वक कमी होऊ शकतो.यात शंका नाही. दुःखही माणसाच्या आयुष्याला विकल करणारी सर्वात वाईट गोष्ट असते. या दु:खायला कवयित्री सहजपणे स्वीकारते. त्याच्याकडे तटस्थतेने पाहते.

माणसं आपल्याला सोडून जातात. आपण त्यांना हाका मारतो, तरी प्रतिसाद मिळत नाही. ही अनिवार्यता आणि त्याची चिकित्सा करीत बसत नाही. त्याकरीता आपण मृत्यूला टाळू शकत नाही आणि टाळता येत नाही. ही प्रामाणिक आंतरिक अस्वस्थता काही कमी होत नाही.स्त्रीचं भावविश्व प्रकट करणाऱ्या त्यांच्या अनेक कविता आहेत. स्त्री जीवनाला व्यापून टाकणा-या अनेक अवस्थांचे शब्दचित्र त्यांची कविता रेखाटतांना दिसते. त्यांची कविता दुःखाच्या व्यापक संदर्भांना साकारताना दिसते. त्यांची साधीसुधी भाषा त्यांच्या कवितेचा स्वभावधर्म बनताना दिसतो. त्यांचे संवेदन विश्व व्यापक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांची कविता नेहमी सूचक बनवून येते. त्यांचे अनेक अनुभव व्यक्तिगत स्वरूपाचे असले तरी त्यांना व्यापक असा सामाजिक संदर्भ असतो. त्यामुळे या सामाजिक घटनांकडे कवयित्री डोळसपणे पाहत जीवनातल्या असंख्य दु:खद अनुभवांना त्यांची कविता व्यक्त करताना दिसते.

कोणतीही वैचारिक गुंतागुंत न करता आपल्या भोवतालच्या विविध स्तरावरील अव्याहत घटनांचा तळ त्यांची कविता ढवळून काढतांना दिसते. कवितेशी शेवटी त्याचं श्वासाचं नातं आहे. त्यामुळे त्या स्वतःला कवितेपासून दूर ठेवू शकत नाहीत. त्यांची कविता त्यांच्या अंत:र्मनाला सुखावणारी, भावविभोर स्वप्नांना सुंदर आकार देणारी एक आश्वासक जागा आहे. याची जाणीव त्यांच्या कविता वाचताना होते. आपल्या जगण्यातल्या सुखदुःखांचा पाढा या कवितेतून मांडताना दिसतात. त्यांच्या कविता संवादी आहे. सूचक आणि अर्थवाही आहेत. निसर्गाला व्यापणारी त्यांची कविता आहे. मनातल्या भावना व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. मानवी मनाच्या वर्तनाची आणि निसर्गाच्या भाव वृत्तीची हळुवार शब्दचित्र रेखाटणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेत आकाश, पाणी, माती, पाऊस, वारा, झाडे, डोंगर, नद्या हे सारे डोकावतात. निसर्गाचा एक वेगळा आविष्कार त्यांच्या कवितेतून वाचकांना पाहायला मिळतो.कवयित्री माया धुप्पड यांच्या कवितेच्या पुढील  प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा.

(लेखकाशी संपर्क – laxmanmahadik.pb@gmail.com किंवा 9422757523)

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – पुण्यात्मा यशवंत – भाग ४

Next Post

या बघा, लंडनमधील १३व्या शतकातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या कांस्य मूर्ती

Next Post
EnGbbJBUcAAQynf

या बघा, लंडनमधील १३व्या शतकातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या कांस्य मूर्ती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011